यवतमाळ - जिल्ह्यातील 77-राळेगाव आणि 78-यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी करण्यात आली. या तपासणी दरम्यान दोन्ही मतदारसंघात अनुपस्थित असलेले 8 आणि त्रृटी आढळलेले 7 अशा एकूण 15 उमेदवारांना नोटीस देण्यात आली आहे. यात भाजपचे मदन येरावार, काँग्रेसचे बाळासाहेब मांगुलकर, प्रा. वसंत पुरकेसह यवतमाळच्या 3 उमेदवारांचा तर राळेगावच्या नऊ उमेदवारांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमदेवारांना आपला दैनंदिन खर्चाचा अहवाल खर्च समितीसमोर सादर करणे बंधनकारक आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या खर्चाची तीन वेळा तपासणी करण्यात येते. 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या खर्चाची तपासणी गार्डन हॉल येथे करण्यात आली. या तपासणीदरम्यान अनुपस्थित असलेले उमेदवार संदीप देवकते, अशोक काळमोरे आणि मनोज गेडाम यांना तर खर्चाच्या अहवालात त्रृटी आढळल्या अनिल उर्फ बाळासाहेब मांगूळकर आणि मदन येरावार यांना नोटीस देण्यात आली आहे.
यावेळी 78 – यवतमाळ विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक राजीव कुमार, सहाय्यक खर्च निरीक्षक सुधीर भट, खर्च तपासणी प्रमुख उमेश पकाले, सहाय्यक लेखाधिकारी संजय हुडेकर, विनोद कांगे, शॅडो पथकप्रमुख अरुण मानकर उपस्थित होते. सातही विधानसभा मतदारसंघासाठी खर्च विषयक बाबींसाठी असलेले नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी खर्च सनियंत्रण पथकाला भेट देऊन खर्च विषयक बाबींचा आढावा घेतला.
राळेगाव विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या खर्चाची पहिली तपासणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात करण्यात आली. या तपासणीदरम्यान अनुपस्थित असलेले माधव कोहळे, मधुसूदन कोवे, प्रा. वसंत पुरके, उत्तम मानकर, नामदेव आत्राम यांना तर खर्चाच्या अहवालात आणि नोंदवहीत त्रृटी आढळलेल्या कविता कन्नाके, शैलेश उर्फ भास्कर गाडेकर, दिगांबर मेश्राम, गुलाब पंधरे आणि मधूकर खसाळकर यांना नोटीस देण्यात आली आहे.