यवतमाळ - पुसद शहरात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, संबंधित प्रशासनाने शहरात कडक निर्बंध घातले आहेत. त्यातच आता विनाकारण घरा बाहेर फिरणाऱ्यावर आळा घालण्यासाठी पुसद शहरातील नऊ पेट्रोलपंप चालकांनी कोरोनाची टेस्ट आणि मास्क असल्याशिवाय पेट्रोल न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अनावश्यक फिरणाऱ्यावर चांगलाच चाप बसला आहे.
या पेट्रोल पंपावर मिळणार नाही पेट्रोल
विष्णू महाजन ॲन्ड सन्स शिवाजी महाराज चौक, आहाळे पेट्रोल पंप शिवाजी महाराज चौक, रामदेव बाबा पेट्रोल पंप नागपूर रोड, रिलायन्स पेट्रोल पंप नागपूर रोड, असेगावकर पेट्रोल पंप श्रीरामपूर, प्रभा प्रभा पेट्रोल पंप वाशिम रोड, केशव सर्व स्टेशन पेट्रोल पंप कोपरा फाटा, राजू नाईक पेट्रोल पंप गायमुख नगर, ए.बी.जैस्वाल पेट्रोल पंप वरुड या पेट्रोल पंपावर येणाऱ्या ग्राहकांना कोरोना टेस्ट चाचणी रिपोर्ट असल्याशिवाय व तोंडाल मास्क घातला नसेल तर पेट्रोल देऊ नये, असा आदेश तहसीलदार पुसद अशोक गीते यांनी पेट्रोल पंप चालकांना दिला होता.
गर्दीला बसला आळा
येथील पेट्रोल पंपावर गर्दी करणाऱ्या नागरिकांना पेट्रोलसाठी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याकडून विचारणा करण्यात येत होती. परंतु अनेक नागरिकांजवळ कोरोना चाचणीची पावती नसल्यामुळे नागरिकांना पेट्रोल दिले जात नव्हते. त्यामुळे काही नागरिक शहरा बाहेरील पेट्रोल पंपावर गर्दी करीत असल्याचे दिसून आले. मास्क बंधनकारक असले तरी अनेकजण अजूनही मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे. शहरात कोरोना पॉझिटिव्हची वाढती संख्या लक्षात घेता, पेट्रोलपंप चालकांनी आता मास्क घातला नसेल तर पेट्रोल मिळणार नाही, अशी मोहीम राबविल्याने कोरोनाला आळा बसू शकनार आहे. त्यामुळे नो मास्क, नो टेस्ट तर नो पेट्रोल ही संकल्पना गर्दी कमी करण्यासाठी नक्कीच लाभदायक ठरू शकते.