यवतमाळ - ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अनेक ग्रामपंचतींमध्ये या वर्षी नव्या दमाच्या उमेदवारांना संधी देण्यात आली. या संधीचे सोने करीत काही नव उमेदवार विजयी झाले. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जो शब्द मतदारांना दिला, तो आता पाच वर्षात पूर्ण करणार असल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली.
हेही वाचा - यवतमाळ ग्रामपंचायत निवडणूक : कुठे नेत्यांना धक्का तर कुठे जल्लोष
प्रस्थापित गावपुढाऱ्यांना मतदारांनी नाकारले
गावागाड्याच्या राजकारणात प्रस्थापित गाव पुढाऱ्यांना धोबीपछाड देत मतदारांनी नवीन चेहऱ्यांना पसंती दिल्याचे चित्र जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये बघावयास मिळाले. जिल्ह्यातील गावांचा विकास करायचा असेल तर प्रस्थापित चेहऱ्यांना नाकारले पाहिजे, असा चंगच मतदारांनी बांधला होता. आणि म्हणूनच मतदारांनी गावातील सत्ता परिवर्तन करून जेष्ठ आणि प्रस्थापित उमेदवारांना चारीमुंड्या चित करीत नव्या दमाच्या उमेदवारांच्या हाती गावाच्या विकासाची सूत्रे दिली.
एकच ध्यास गावाचा विकास
अनेक वर्षांपासून गावातील रस्ते, मंदिरे, लाईट, पाणी, वीज, नाल्या या प्रश्नावरती प्रस्थापितांनी निवडणुका लढवीत सत्ता काबीज केली. मात्र, याही पलीकडे गावाचा विकास करायचा असेल तर शासनाच्या विविध योजना, ग्रामपंचायतीच्या मिळणाऱ्या उत्पन्नातून गावाचा कायापलट कशा पद्धतीने करता येईल, गावातील लोकांना गावातच रोजगार कसा मिळेल, महिलांसाठी गावातच उद्योग कसा उभारता येईल आणि महाराष्ट्रात आपल्या ग्रामपंचायतीचे नाव लौकिक कसा करता येईल, यासाठी प्रयत्नशील असणार असल्याची प्रतिक्रिया विजयी उमेदवारांनी दिली.
हेही वाचा - जिल्ह्यात बर्डफ्लूचे संकट गडद; लिंगटीत आणखी 76 कोंबड्या तर आर्णीत २ कावळ्यांचा मृत्यू