यवतमाळ - आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. दरम्यान, एका कार्यक्रमात महाराष्ट्र किसान काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष नाना पटोले यांनी संघानेच गोपीनाथ मुंडे यांना संपविले असून, आता कन्या पंकजा मुंडे यांनाही संपवत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. महाराष्ट्र किसान काँग्रेसच्या विदर्भ अध्यक्ष म्हणून देवानंद पवार यांच्या नियुक्तीनिमित्त घाटंजी येथे सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता, यावेळी ते बोलत होते.
यावेळी काँग्रेसचे विधान परिषदचे आमदार हरिभाऊ राठोडसह अनेक काँग्रेसचे पदाधिकरी उपस्थित होते. लोकसभेचे पडघम वाजले आहेत. त्यामुळे राजकीय सावट या नागरी सत्कारावर होतेच. याच सभेत नाना पटोले यांनी हे वादग्रस्त विधान करत ओबीसी समाजाला एक संदेश देण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन केवळ जुमला असल्याचे सांगत उद्योजकांचे कर्ज मात्र माफ केल्याचे पटोले म्हणाले. मात्र, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली नाही, त्यामुळेच भाजप सोडल्याची खंत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्यासह शिवसेनेच्या इतर पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर हप्ता द्यावा लागत असल्याचे बोलून शिवसेनेवर सडकून टीका केली.
यावेळी भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये एक मुंगीही मेली नसल्याचा दावा काँग्रेसचे आमदार हरिभाऊ राठोड यांनी केला. निवडणुकीच्या काळामध्ये नागरिकांनी मोदींच्या खोट्या जाहिराती न पाहण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला आहे. तसेच यवतमाळ, वाशिम, हिंगोली आणि चंद्रपूर या लोकसभा मतदार संघासाठी आपण तिकीट मागितल्याचे यावेळी सांगितले. विशेष बाब म्हणजे नाना पटोले आणि हरिभाऊ राठोड हे एकेकाळी भाजपच्या तिकिटावर लोकसभेत निवडून गेले होते. सध्या ते काँग्रेसमध्ये आहेत.