यवतमाळ - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये यवतमाळ जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनासह सामान्य नागरिकांनी चांगलीच धास्ती घेतली होती. मात्र, नेर या गावात शंकर-नाना या रुग्णसेवक जोडींनी रुग्णांना धीर देत कमालीचं काम केलं आहे. रात्री-बेरात्री कोणत्याही रुग्णांचा फोन आला की ही जोडी हातातील सर्व काम बाजूला करून आधी लगीन कोंडाण्याचं ही भूमिका घेत होते. ज्या ठिकाणी बाधित रुग्णाचे सख्खे नातेवाईक दूर जात होते त्याठिकाणी हे दोघे पुढे येऊन त्यांना रुग्णालयात आणत होते. त्यामुळे शंकर आणि नानाची जोडी सर्वत्र परिचित झाली.
- रात्रीबेरात्री रुग्णांच्या मदतीला -
नाना घोंगडे आणि शंकर भागडकर हे दोघेही नेरमधील रहिवासी आहेत. ते गेल्या 12 वर्षांपासून रुग्ण सेवेत गुंतले आहेत. आता गेल्या दीड वर्षापासून जेव्हा कोरोनाने थैमान घातले, त्यावेळी या दोघांनीही न थांबता रुग्ण सेवा करत आहेत. नेर तालुक्यातील कोणत्याही गावातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा नाना किंवा शंकरला फोन आला तर ते रात्रीबेरात्री रुग्णांच्या मदतीला धावून जातात. रुग्णवाहिकेतून रुग्णाला घेऊन येतात आणि रुग्णालयात भरती करतात. हे सर्व काम करत असताना त्यांनी स्वतः च्या जीवाची पर्वा केली नाही. रुग्ण सेवा करत असताना नाना स्वतः कोरोनाने बाधित झाले. मात्र, त्यांनी हिम्मत सोडली नाही. उलट उपचार घेत असतानाही काम करत राहिले. या दोघांच्या घरातील सदस्य त्यांच्या रुग्ण सेवेमुळे चिंतित असतात. मात्र, नाना आणि शंकर दोघेही रुग्ण सेवेला ईश्वर सेवा मानतात.
- कामातून अनेकांना ऊर्जा -
कोरोनाच्या काळात नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या जवळ जात नाही. त्याला अक्षरशः वाळीत टाकल्यासारखी स्थिती निर्माण होते. त्यामुळे ते खचून जातात आणि बरेच रुग्ण हिम्मत सोडून देतात. अशावेळी लोकांच्या नजरेसमोर सर्वप्रथम नाना आणि शंकरचे नाव समोर येते. या दोन तरुणांच्या सेवेमुळे अनेकांचे प्राण वाचले आहेत.
नाना-शंकर हे दोघेही सामान्य कुटुंबातील आहेत. मात्र, त्यांचं काम सोन्यासारखे आहे. हे दोघेही रुग्णांच्या जवळ जाऊन त्यांची देखभाल करत आहेत. त्यांच्या या कामातून अनेकांना ऊर्जा मिळाली. सामान्य कुटुंबातील या दोन तरुणांनी रुग्ण सेवेचा जो ध्यास घेतला आणि अनेकांचे प्राण वाचवले, त्यामुळे त्यांच सर्वत्र कौतुक केले जात आहे.