यवतमाळ - पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादाचा वचपा काढण्यासाठी तरुणाचा धारधार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना दारव्हा मार्गावरील लोहारा येथे घडली. या झटापटीत मारेकरीदेखील जखमी झाला असून, त्याच्यावर वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. सोहेल बिसमिल्ला खान (21, रा. देवीनगर) असे मृताचे नाव आहे. त्याचा भाऊ जावेद बिसमिल्ला खान (28, रा. उद्योगनगर, लोहारा) याने लोहारा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
सोहेलचे घरी पटत नसल्याने तो वेगळा देवीनगरात राहत होता. मंगळवारी सोहेलच्या मित्रांनी घटनेची माहिती जावेदला दिली. मारेकरी व सोहेल यांच्यात जुना वाद होता. त्यामुळे त्यांच्यात पटत नव्हते. याच कारणातून रात्रीदरम्यान संशयित गणेश कानोडे, दुर्गादास चौहान, प्रकाश रासकर, विनय उर्फ आनंद पाल यांनी संगणमत करून निर्घृन खून केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून गुन्हा नोंदवण्यात आला.
सोहेलवर हल्ला करताना विनय उर्फ आनंद पाल हा देखील झटापटीत जखमी झाला. त्याला उपचारासाठी वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.