यवतमाळ : मुंबईमध्ये फसवणूक करून लुटलेले सोने यवतमाळमध्ये आरोपीने विक्रीकरिता आणले होते. याची खबर मुंबई पोलिसांना कळाल्यामुळे मुंबई पोलीस ( Mumbai Police ) यवतमाळमध्ये दाखल होऊ त्यांनी एकाला ( Gajanan Tansukrai Aggarwal ) अटक केली आहे. फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल चार कोटींच्या सोने-चांदीची यवतमाळात विक्री झाल्याच्या संशयावरून मुंबईचे पथक आज यवतमाळमध्ये धडकले. यावेळी त्यांनी यवतमाळमधील दोन सराफा व्यापाऱ्यांची चौकशी केली. गुन्ह्यात तथ्य आढळल्याने यातील एकाला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.
अपहार केलेले सोने यवतमाळमध्ये विक्रीला : गजानन तनसुकराय अग्रवाल (38) ( रा. राजस्थान ) असे आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी हा पूर्वी यवतमाळ येथे वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार मुंबईमध्ये लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन येथे आरोपीचा नातेवाईक असलेल्या सराफा व्यापाऱ्याने तक्रारी दिली आहे. तक्रारीत चार कोटींचा अपहार झाल्याचे नमूद आहे. त्यानुसार अपराध क्रमांक 835/22 मध्ये भादंवी 420, 409 कलमान्वये गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीने जवळपास 1500 ग्रॅम सोने व 35 किलो चांदी असा एकूण अंदाजे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल यवतमाळ येथील दोन व्यापाऱ्यांना विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
मुंबई पोलीस यवतमाळमध्ये दाखल : त्या अनुषंगाने आज मुंबई येथील लोकमान्य टिळक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील कुमार वंजारी ( Assistant Police Inspector Sushil Kumar Vanjari ) हे आपल्या पथकासह यवतमाळ येथे दाखल झाले. दरम्यान, आरोपीने त्यांना यवतमाळ येथील दोन सराफा व्यापाऱ्यांची दुकाने दाखविली. यावेळी पोलिसांनी संबंधित दोन्ही दुकानांची झाडाझडती घेतली. दरम्यान, एका दुकानांमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधित सराफा व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.