यवतमाळ - तालुक्यातील चिचघाट, चापडोह परिसरात सुरू असलेल्या गावठी हात भट्टीवर जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने धाड टाकली. यामध्ये तब्बल 4 हजार 775 लिटर मोहा सडवा व दारू असा एकूण 4 लाख 86 हजार 500 रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जगदीश अगलदरे (रा. वागद), श्रीकांत कोडापे (रा. चिचघा), संजय जीवने (रा. भोसा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
गोपनीय माहितीच्या आधारे धाड
जिल्हा पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भुजबळ यांना गोपनीय मााहिती मिळाली की, वडगाव जंगल पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या चिचघाट, चापडोह परिसरातील जंगलात अवैधरित्या गावठी दारू गाळणे सुरू आहे. या माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक पथकाने घटनास्थळावर छापा मारला. तसेच तीन वेगवेगळ्या ठिकाणावरून 4 हजार 775 लिटर मोहा सडका, 45 लिटर गावठी दारू असा एकूण 4 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलमान्वये वडगाव जंगल पोलिसात गुन्हे दाखल केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन पाटेकर, सचिन घुगे, वाघमारे, राठोड, चव्हाण, कासार, साबळे, सहारे व इतर कर्मचाऱ्यांनी केली.
हेही वाचा - बर्ड फ्ल्यू नाही तर थंडीने होत आहे पक्ष्यांचा मृत्यू
हेही वाचा - ग्रामपंचायत निवडणुकीत पंधरा हजार उमेदवार रिंगणात; एक हजार 346 सदस्य बिनविरोध