यवतमाळ - सरकारने पंधरा दिवसांत माओवाद्यांचा बिमोड करावा. अन्यथा ज्या ठिकाणी माओवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात आपल्या जवानांना वीरमरण आले, त्या घटनास्थळापासूनच आंदोलन सुरू करू, असा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शासनाला दिला आहे.
आमदार बच्चू कडू यांनी यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा येथे हुतात्मा अग्रमान रहाटे यांच्या घरी भेट दिली. यावेळी त्यांनी अग्रमान यांना श्रद्धांजली अर्पण करून पत्नी सोनाली, आई निर्मला व भाऊ आशिष यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना त्यांनी सरकारला इशारा दिला.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये माओवाद्यांच्या क्षेत्रात कशाप्रकारे रणनीती आखली पाहिजे. कुठल्या उपाययोजना शासनाने करायला पाहिजे. यासंदर्भात योग्य नियोजन करण्याची गरज आहे. या क्षेत्रातून दोन वाहने सुरक्षित निघतात आणि ज्या वाहनांमध्ये जवान जात असतात तेच वाहन माओवादी कसे काय टार्गेट करतात, असा सवाल करत त्यांनी या हल्ल्याबाबत संशय व्यक्त केला.
देशात दहशतवादी हल्ला झाला तर संपूर्ण देश एकत्र येतो. मात्र, माओवाद्यांनी केलेला हल्ला केंद्र व राज्य सरकार अद्यापही गांभिर्याने घेत नसल्याचा आरोपही आमदार बच्चू कडू यांनी जाहीरपणे केला.
बच्चू कडू म्हणाले, कुठल्या जिल्ह्यातील पोलिसांचे सैन्यबळ माओवाद्यांपेक्षा जास्त असते. माओवाद्यांच्या हल्ल्यात गरीब घरातीलच मुले शहीद होत आहेत. त्यामुळे या गंभीर प्रकाराची शासनाने दखल घेतली नाही. तर येत्या पंधरा दिवसांत ज्या ठिकाणी हल्ला घडवून जवान शहीद झालेत त्या ठिकाणापासून तीव्र आंदोलन उभारू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी शासनाला दिला. यावेळी प्रहारचे राज्य संपर्कप्रमुख प्रमोद कुदळे जिल्हाप्रमुख विलास पवार उपस्थित होते.