यवतमाळ - शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना आर्थिकरित्या सक्षम करण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या संकल्पनेतून ‘मिशन उभारी’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शासनाच्या मदतीसोबतच विविध योजनेंतर्गत अशा कुटुंबांना लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र जे कुटुंब शासकीय योजनांच्या निकषात बसत नाही किंवा शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये अपात्र ठरतात, अशाही कुटुंबांना उभे करणे आवश्यक आहे. या कुटुंबांना सीएसआर फंडमधून लाभ देऊन आधार देण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांच्या 'मिशन उभारी' खरोखरच शेतकऱ्यांच्या जीवनाला उभारी देण्याचे काम करणार आहे.
आत्महत्याग्रस्त कुटुंबाशी सवांद
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला तालुकास्तरीय यंत्रणेसह प्रत्येक आठवड्याला मुख्यालयी बोलावून त्यांच्यासोबत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहे. यात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती, उदरनिर्वाहाचे साधन, शेतजमीन याबाबत प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. बहुतांश कुटुंबांनी उदरनिर्वाहासाठी शेळी, गाय, म्हैस यांची मागणी केली आहे. पशुसंवर्धन विभागांतर्गत दुधाळ जनावरांचे वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र तरीसुध्दा काही कुटुंब अटी, शर्ती किंवा निकषात बसत नसल्यामुळे ते लाभांपासून वंचित राहतात. त्यामुळेच कंपन्यांच्या सीएसआर फंडमधून अशा कुटुंबांना आर्थिक मदत करणे, हा मुख्य उद्देश आहे.
दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न
शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंब हे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असतात. या कुटुंबाच्या गरजाही कमी असतात. त्यांच्या अपेक्षा खुप नाही. त्यांना दैनंदिन उदरनिर्वाह करण्यासाठी कंपन्यांच्या किंवा बँकांच्या निधीमधून दुधाळ जनावरांचे वाटप केले तर त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित चालण्यास नक्कीच मदत होणार आहे.
हेही वाचा - लोअर परळ भागातील सन मिल कंपाऊंडला आग, अग्निशमन दल दाखल
हेही वाचा - क्रीडा जगताला धक्का : महान फुटबॉलपटू मॅराडोना यांचे हृदयविकाराने निधन