यवतमाळ - जिल्ह्यात अल्पवयीन मुलाने वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. मोबाईल न दिल्याच्या कारणावरून मुलाने बाजेच्या ठाव्याने पित्याच्या डोक्यात घाव घातले. ही घटना महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथे घडली. सुभाष हरिभाऊ ठाकरे (40) असे मृताचे नाव आहे.
मृत सुभाष हरिभाऊ ठाकरे हे झोपडपट्टी वसाहतीत राहतात. त्यांचा मुलगा हा नेहमीप्रमाणे घरी आला. मुलाचा चार्जिंगला लावून असलेला मोबाईल वडिलाने घेतला होता. माझा मोबाईल मला द्या, अशी मागणी आरोपी वडिलांना करत होता. परंतु मोबाईल न दिल्याने त्याचा राग अनावर झाला व रागाच्या भरात घरात असलेल्या बाजेच्या ठाव्याने वडिलांच्या डोक्यावर आघात केले. यात वडिलांचा जागीच मृत्यू झाला.
वडिलांचा मृत्यू झाल्याचे कळतात त्याने जवळ असलेल्या लाकडांवर प्रेतवर टाकून स्वतःच भडाग्नी देऊन जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु ऐनवेळी त्याला घरात आगपेटी न सापडल्याने तो आगपेटीसाठी शेजाऱ्यांकडे गेला. भर दुपारी मुलाला आगपेटीची काय आवश्यकता आहे, हे बघण्यासाठी शेजाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. त्यांनी आरोपी मुलांला पकडून चितेला जाळण्याचा डाव उधळून लावून त्याला एका झाडाला बांधून ठेवले. या रक्तरंजित घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची तक्रार पोलीस पाटील प्रवीण कदम यांनी महागाव पोलीस स्टेशनला देताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. शव उत्तरीय तपासणीसाठी सवना येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सदर घटनेचा तपास महागाव येथील पोलीस निरीक्षक दामोदर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी शेंगेपल्लू, उपनिरीक्षक उमेश भोसले, बिट जमादार रमेश पवार, दीपक रुडे, माणिक पवार, प्रमोद केशवे, ज्ञानेश्वर देशमुख आदी करत आहेत.