यवतमाळ - चार वर्षांपूर्वी पुनर्वसन गावात कामे करण्यासाठी निधी दिला तो खर्च का करण्यात आला नाही, असा प्रश्न करत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी विभागाची चांगलीच कानउघाडणी केली आहे. अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे कामे खोळंबल्याची माहिती दिल्याने वडेट्टीवार यांचा पार पुन्हा चढला. कोरोनाच्या काळात अनेक कामे झाली. मदतीच्या गावातील कामांना कोणती अडचण होती. असे बेताल कारणे सांगू नका, अशा शब्दांत अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी (शुक्रवार) विश्राम भवन येथे प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन व सुविधेचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यात पुनर्वसन झालेल्या गावातील अनेक अडचणी आहेत. त्या सोडविण्यासाठी निधी देण्यात आला आहे. गावठाण विस्तार यासह अनेक प्रश्न आहेत. चार वर्षापुर्वी निधी देवूनही अजुनही अनेक ठिकाणचे काम झालेले नाही. याचा अर्थ संबंधित विभाग काम करत नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले. शासनाने निधी देवूनही प्रशासन काम करत नसेल तर ते चुकीचे आहे. प्रशासनाने कामांची स्पीड वाढविण्याच्या सूचना मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यांनी केल्या. जिल्ह्यात पूर आणि गारपिटीमुळे झालेले नुकसान आणि भरपाईबाबत आढावा घेतांना वर्षभरात वीज पडून 21 व्यक्तींचा मृत्यू झाल्याबाबत त्यांनी दुःख व्यक्त केले. मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक गावात वीज अटकाव यंत्र बसविण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला दिले आहे. मंडळ निहाय वीज अटकाव यंत्र बसविण्यासाठी प्रलंबित 3 कोटी 18 लक्ष निधी आणि नुकसान भरपाईसाठीचा 82 कोटी 31 लक्ष रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देण्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली आहे.
दोन महिण्यात काम पूर्ण करण्याचे आदेश
बेंबळा प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील 20 गावांच्या पुनर्वसनापैकी 17 गावांचे पुनर्वसन झाले आहे. दर्जेदार नागरी सुविधा निर्मितीसाठी निधी उपलब्ध असतानाही काम अपूर्ण असल्याबाबत वडेट्टीवार यांनी नाराजी व्यक्त केली. नागरी सुविधांची कामे दोन महिन्यात पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिले आहेत. यावेळी कोहळ लघु पाटबंधारे योजना, बेंबळा, अरुणावती, टाकळी- डोल्हारी मध्यम प्रकल्प, अमडापुर लघु प्रकल्प, निम्न पैनगंगा, खर्डा लघु प्रकल्प इत्यादी प्रकल्पाच्या पुनर्वसनाचा आढावा घेतला. टाकळी- डोल्हारी मध्यम प्रकल्पातील उदापुर, अमडापुर लघु प्रकल्पातील कुरळी, घमापूर या तीन गावांचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्याच्या सूचना वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
हेही वाचा - Rajesh Tope On Third Wave : राज्यातील निर्बंध कमी करण्याकडे कल; मार्चमध्ये तिसरी लाट संपेल - राजेश टोपे