मुंबई : खंडणी विरोधी पथकानं कुख्यात गँगस्टर डी के राव याला बेड्या ठोकल्या आहेत. डी के राव आणि त्याच्या 6 हस्तकांनी अडीच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची तक्रार एका हॉटेल व्यावसायिकाने मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच आणि खंडणी विरोधी पथकाकडे दाखल केली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकानं डी के राव याच्यासह त्याच्या सहा हस्तकांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आता डी के राव आणि त्याच्या सहा हस्तकांना बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेचं पथक करत आहे, अशी माहिती पोलिसांनी वृत्तसंस्थेला दिली आहे.
हॉटेल व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप : मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेतील खंडणी विरोध पथकाला मिळालेल्या तक्रारीनुसार एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटी रुपयाची खंडणी मागण्यात आली. या प्रकरणी या हॉटेल व्यावसायिकानं खंडणी विरोधी पथकाकडं तक्रार दाखल केली. खंडणी विरोधी पथकानं केलेल्या चौकशीत डी के रावनं एका हॉटेल व्यवसायिकाकडून खंडणी म्हणून अडीच कोटी रुपये मागितल्याचं आणि खंडणी दिली नाही, तर हत्या करण्याची धमकी दिल्याचं समोर आलं. याप्रकरणी पोलिसांनी तपास करुन डी के राव विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला. डी के राव आणि त्याचे सहा साथीदार अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली असून याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.
आज दुपारी करणार न्यायालयात हजर : अंधेरी येथील हॉटेल व्यावसायिकाला धमकावून त्यांच्याकडं खंडणी मागितल्याचा डी के राव याच्यावर आरोप आहे. डी के राव आणि त्याच्या साथीदारांना गुरुवारी दुपारी महानगर दंडाधिकारी न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2017 मध्ये डी के रावला एका खंडणीच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यामध्ये त्याला 2022 ला मुंबई उच्च न्यायालयातून जामीन मिळाला. डी के रावचा इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा राहिला आहे. गुन्हेगारीत पदार्पण केल्यानंतर लवकरच डी के राव छोटा राजनचा उजवा हात म्हणून ओळखला जाऊ लागला.
हेही वाचा :