यवतमाळ - नेर येथील आजंती शिवारात आढळलेल्या मांडूळ सापास जीवदान देण्यात आले आहे. आंजती रस्त्यालगत आज सकाळी काही प्रवाशांना मांडूळ साप आढळला. त्यानंतर येथील नागरिकांनी या दुर्मिळ असलेल्या सापाला संरक्षित वन परिसरात सुखरूप सोडून दिले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, आजंती रस्त्यावरील गणेश राऊत यांच्या शेतालगत काही प्रवाशांना मांडूळ साप आढळून आला. सर्वसाधारणपणे हा साप 2 ते अडीच फूट लांबीचा असतो. मात्र, हा साप तब्बल 4 फूट लांबीचा होता. या सापाबद्दल समाजात अनेक अंधश्रद्धा व गैरसमज आहेत. गुप्तधन शोधण्यासाठी या सापाची मदत होते, असाही मोठा गैरसमज आहे. त्यामुळे गुप्तधन शोधणारे या सापाच्या मागावर असतात. या सापाला बाजारात मोठ्या प्रमाणात किंमत मिळते. त्यामुळे या सापाची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते.
दरम्यान, हा साप दिसल्यानंतर सामाजिक कार्यकर्ते किशोर अरसोड यांनी तत्काळ वनविभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, सापाला पकडून त्याला जंगलात सोडून दिले. यावेळी वनविभागाच्या वनरक्षक सृष्टी राठोड, चालक अशोक कदम, वनमजुर शंकर इंगोले उपस्थित होते.