यवतमाळ- यवतमाळ जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकला आहे. अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार, तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे क्रांती उर्फ बाळासाहेब कामारकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेनेने तब्बल 58 वर्षानंतर जिल्हा परिषदेवर भगवा फडकवला आहे.
हेही वाचा- शबरीमला प्रकरण : पुनर्विचार याचिकेवर आजपासून सुनावणी
यवतमाळ जिल्हा परिषदेवर भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. यात काँग्रेसच्या माधुरी आडे या अध्यक्ष होत्या, तर भाजपचे श्याम जयस्वाल हे उपाध्यक्ष होते. त्यांचा अडीच वर्षाचा कालखंड संपल्याने आता नव्याने निवडणूक झाली. मात्र, राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्याने जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलले.
महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदी शिवसेनेच्या कालिंदा पवार, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून बाळासाहेब कामारकर यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. शिवसेना 20, राष्ट्रवादी काँग्रेसचे 11 आणि काँग्रेस 12, असे महाविकास आघाडीचे 43 पक्षीय बलाबल आहे, तर विरोधी भाजपकडे 18 सदस्य संख्या आहेत. संख्याबळ जुळत नसल्याने भाजपने निवडणुकीतून माघार घेतली आहे. 1962 पासून आजपर्यंत काँग्रेसची एकहाती सत्ता जिल्हा परिषदेवर होती.