यवतमाळ - शहरात नागरिकता संशोधन कायद्याविरोधात सुरू असलेल्या 'शाहीनबाग' आंदोलनाला विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भेट दिली. यावेळी मुस्लिम आंदोलक महिलांच्या प्रतिनिधी मंडळाने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत चर्चा करताना सीएए, एनआरसी तसेच एनपीआरसह विविध मुद्दे त्यांच्या समोर मांडले.
हेही वाचा... गायरान जमीन मिळविण्यासाठी शहीद जवानाच्या पत्नीची वर्षभरापासून पायपीट; जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष
हा कायदा नागरिकता विरोधी आहे. त्याच्यामुळे आम्हा महिलांना आपल्या बाळासोबत रस्त्यावर येऊन आंदोलन करावे लागत आहे. सरकार आमच्या भावना व मागण्या यावर लक्ष देण्यास तयार नाही. या आंदोलनाला सरकार विरोधी मानसिकता असल्याचे सरकार बोलत आहे. मात्र, आमच्या आंदोलनाचे त्यासोबत काही घेणे देणे नसल्याने राज्य सरकारने यावर ठोस पावले उचलून काहीतरी उपाययोजना करावी, असे यावेळी आंदोलकांनी पटोले यांना सांगितले.
त्याच प्रमाणे एनआरसी लागू करण्यासाठी केंद्र सरकारचे पहिले पाऊल एनपीआर आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात एनपीआर प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी आंदोलक महिलांनी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्यासमोर ठेवली. याप्रसंगी पटोले यांनी हा कायदा केंद्र सरकार आहे, मात्र राज्य सरकार याबद्दल ठोस भूमिका घेईल. त्यासाठी आवश्यक ती तरतूद करू असे आश्वासन दिले.