यवतमाळ - जिल्ह्याची वणी तालुक्यातील रहिवासी असलेले लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी ( Vasudev Awari) यांचे अरुणाचल प्रदेशच्या भारत चीन सीमेवर हृदयविकाराच्या झटक्याने निधन ( Vasudev Awari passed away ) झाले होते. त्यांच्यावर आज मूळ गावी मुर्धोनी येथे अंत्यसंस्कार ( Funeral of Vasudev Awari in Murdhoni ) करण्यात आले.
21 तोफांची सलामी - गुरुवारी रात्री उशिरा लेफ्टनंट कर्नल वासुदेव यांचा पार्थिव मुर्धोनी नेण्यात आले. आज शुक्रवारला दुपारी 12 वाजता राहत्या घरुण अंत्ययात्रा निघाली. यावेळी वंदे मातरम, भारत माता की जय, आवारी साहेब अमर रहेच्या घोषणा संपूर्ण गावात ऐकू येत होती. यावेळी घराघरातून पार्थिवावर फुलाचा वर्षाव करत त्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. सुरुवातीला लष्कराच्या जवानांनी लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांना सलामी दिली नंतर पोलीस विभागामार्फत 21 तोफांची सलामी देत मानवंदना देण्यात आली लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांच्यावर गणमान्य नागरिकांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अश्रू अनावर - लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी मूळ गाव असलेले मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात झालेल्या अंत्यसंस्काराला आर्मीचे अधिकारी, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार व लोकप्रतिनिधी सह वनी परिसरातील व गावातील हजारोंचा जनसागर उपस्थित होता. भावपूर्ण, शोकाकुल वातावरणात झालेल्या संस्काराच्या वेळी अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.
नुकतेच लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती : लेफ्टनंट कर्नल वासूदेव दामोदर आवारी हे 170 फिल्ड रेजिमेंट वीर राजपूर मध्ये कर्तव्यावर होते. नुकतेच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नल पदावर पदोन्नती मिळाली होती. त्यांचे शालेय शिक्षण विवेकानंद विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी NDA येथे प्रवेश घेतला. त्यानंतर ते आर्मीत मेजर या पदावर रूजू झाले होते.अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर समुद्रसपाटी पासून 16 हजार फूट उंचीवर मंगळवार दि. 4 ऑक्टोबरला कर्तव्य बजावत होते. त्यावेळी त्यांना श्वास घेताना त्रास होऊ लागला. सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ गुवाहाटीतील मिलीट्री बेस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
शोकसागरात बुडावणारी घटना : देशसेवा करत असलेल्या सुपुत्राचे अनपेक्षितपणे झालेले निधन मनाला चटका लावणारे आहे. मुर्धोनी गावातील ग्रामस्थांसोबतच वणीकरांना शोकसागरात बुडावणारी ही घटना आहे. लेफ्टनंट कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव गुवाहाटी वरून विमानाने नागपूर विमानतळावर दुपारी 4:30 वाजता पोहचले. त्यानंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री वणी येथे आणण्यात आले.