यवतमाळ - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी देशपातळीवर लॉकडाऊन करण्यात आले आहे. गावपातळीवरदेखील कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील जामडोह ग्रामस्थांनी कोरोनाला गावाबाहेरच रोखण्यासाठी गावबंदीचा निर्णय घेतला आहे. यात बाहेर गावाहून येणाऱ्या नागरिकांना कोरोना नसल्याच्या खात्रीनंतरच गावात प्रवेश दिला जाणार आहे. गावाच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय सर्व गावकऱ्यांनी मिळून घेतला असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
हेही वाचा... कोरोनामुळे मरू तेव्हा मरू...! मात्र आता आमच्यावर उपासमारीची वेळ आलीय.... ऊसतोड कामगारांची कैफियत...
पुणे-मुंबईसारख्या शहरात रोजगार आणि शिक्षणासाठी वास्तव्याला गेलेल्या नागरिकांचे लोंढे कोरोनामुळे आता गावखेड्याकडे वळत आहे. राज्य परिवहन महामंडळाने एसटी बसच्या फेऱ्या रोखल्या आहेत. असे असले तरीही काहीजण खासगी वाहनाने गावाकडे जात आहेत.
दररोज बाहेर ठिकाणाहून गावात आलेल्या नागरिकांचा आकडा वाढत आहे. यामुळे जामडोह गावातील गावकरी चांगलेच धास्तावले आहेत. विदेशातून आलेल्या व्यक्ती आणि पुणे-मुंबईतील व्यक्ती यांच्यामुळेच कोरोनाचा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत असल्याचा समज या गावकऱ्यांचा आहे. याशिवाय कोणताही व्यक्ती कोरोना विषाणूने बाधित झाला असेल, हे लगेच सांगता येत नाही. याचे कारण कोरोनाची बाधा झालेल्या व्यक्तीत 14 दिवसानंतरच लक्षणे दिसतात. तोपर्यंत या व्यक्तीपासून इतर अनेकांना त्याची बाधा होते. हा प्रकार थांबवण्यासाठी गावकऱ्यांनी बाहेर ठिकाणावरून येणाऱ्या व्यक्तींना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला असल्याचे जामडोह येथील नागरिकांना म्हटले आहे.
हेही वाचा... COVID-19 : अमेरिकेत कोरोनाचे 3 हजार बळी, एक लाख 63 हजार रुग्ण
कोरोनाची बाधा रोखण्यासाठी हा निर्णय गावातील सर्व नागरिकांनी एक विचाराने घेतला आहे. जामडोहच्या मुख्य रस्त्यावर दोर बांधून बाहेर ठिकाणावरून येणारी वाहने थांबवण्यात येत आहेत. रस्त्यावर तशा स्वरूपाचा संदेशही लिहिण्यात आला आहे. त्यामुळे गावाबाहेर पडलेल्या आणि परजिल्ह्यात वास्तव्याला असणाऱ्या व्यक्तींना आता गावामध्ये कोरोना नसल्याची खात्री झाल्यानंतरच प्रवेश मिळणार आहे.