यवतमाळ - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 'स्वच्छ भारत मिशन' राबवले. त्याला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आता प्लास्टिक निर्मूलनासाठी राज्य शासनाने नवीन नियमांची अंमलबजावणी सुरू केली आहे. यामध्ये 50 मायक्रोनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. मात्र, यावरही अवैध प्लास्टिक विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी नवीन शक्कल लढवली आहे. प्लास्टिक पिशवीच्या वेष्टनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या चिन्हाचे छायाचित्र छापून अवैधपणे निकृष्ट विक्री सुरू केली असल्याचा प्रकार यवतमाळमध्ये समोर आला.
हे अवैध प्लास्टिक गुजरातवरून आयात करुन नाशिकमार्गे राज्यात सर्वत्र पुरवले जाते. यातून पंतप्रधानांच्या 'स्वच्छ भारत मिशन' आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या 'प्लास्टिक मुक्त महाराष्ट्र' या संकल्पनेला अवैध प्लास्टिक विक्रेत्यांनी कानामागे टाकले आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी प्लास्टिक मुक्त महाराष्ट्राचा ध्यास घेतला असून यासंदर्भात मार्च अखेरपर्यंत राज्यात सिंगल युज प्लास्टिक पूर्णपणे बंद व्हावे, अशी ताकीदही प्रशासनाला दिली.
हेही वाचा - रडत बसण्यापेक्षा लढणार, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पत्नींनी दिली दहावीची परीक्षा...!
जिल्ह्यात प्लास्टिक बंदीची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येईल. तपासणी मोहीम हाती घेऊन नियमबाह्य प्लास्टिक वापर आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती यवतमाळचे जिल्हाधिकारी देवेंदर सिंग यांनी दिली. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर करू नये, असे आवाहनही जिल्हाधिकारी सिंग यांनी केले.