यवतमाळ - गेल्या वर्षी बोंडअळीने कपाशीचे पीक उद्ध्वस्त झाले. तर सोयाबीनची दुबार पेरणी आणि खोडअळी अली होती. यातून सावरून शेतकर्यांनी यंदा मोठ्या अपेक्षेने कपाशी, सोयाबीन पिकाची लागवड केली. पीक वाढत असताना पिकावर बोंडअळी, मावा, तुडतुडा आदी कीड प्रकारांनी आक्रमण केले आहे. कृषी विभागाच्या अधिकार्यांकडून शेतकर्यांना कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
खरीपाच्या पिकावर शेतकऱ्यांची मदार
जिल्ह्यातील शेतकर्यांची संपूर्ण मदार ही खरीप हंगामातील पिकावर असते. यावर्षी साडेचार लाख हेक्टरवर कपाशी तर एक लाख 80 हजार हेक्टरवर सोयाबीन लागवड करण्यात आली. काही वर्षापासून खरीप हंगामच शेतकर्यांना उद्ध्वस्त करणारा ठरत आहे. यंदाही शेतकर्यांनी कर्ज काढून पिकांची लागवड केली. पिकांची वाढ होत असताना किडीने आक्रमण केले. यापासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी फवारणी करत आहेत. मात्र, त्याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही. बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जाते. कृषी केंद्र चालक आपल्याच मर्जीप्रमाणे शेतकर्यांना औषधी देतात. त्याचाही फटका शेतकर्यांना बसत आहे. या संकटात शेतकरी कृषी विभागाच्या अधिकार्यांना फोन करून मार्गदर्शन मागत आहे. पण, कृषी विभागाकडून कोणत्याही प्रकारचे सहकार्य मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. मागील वर्षी बोंडअळीमुळे नुकसानीची मदत मिळाली नाही. त्यामुळे आत्महत्या करायची का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.
कृषी विभागाकडून अल्प प्रतिसाद
मागील वर्षी बोंडअळीने कपाशीचे अतोनात नुकसान केले. यंदाही तीच परिस्थिती दिसत आहे. मावा, तुडतुडाने आक्रमण केले आहे. कृषी विभागाचे अधिकारी बांधावर येऊन पाहणी करत नाही. फवारणी करूनही फायदा होत नसल्याने नवीनच चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. अनुप चव्हाण या शेतकऱ्यांकडे पंधरा एकर शेती आहे. सात एकरात कपाशी व आठ एकरात सोयाबीन लागवड केली आहे. मावा, तुडतुडा, पांढर्या माशीपासून पिकांची सुरक्षा करण्यासाठी फवारणी केली. पण, कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. कृषी अधिकार्यांना फोन केला. त्यांच्याकडूनही प्रतिसाद मिळालेला नाही.
नुकसान भरपाईची मागणी
मागील वर्षी शेतकर्यांना बोंडअळीने उद्ध्वस्त केले. हेक्टरी एक क्विंटलही कापूस निघाला नाही. बीयाणे कंपनीकडून शेतकर्यांची फसवणूक केली जात आहे. आम्ही जोपर्यंत घरचे बियाणे वापरत होतो. तोपर्यंत कोणतीही कीड पिकांवर येत नव्हती. बोगस बियाणे शेतकर्यांच्या माथी मारले जात आहे. मागील वर्षीची व यंदाची हेक्टरी 25 हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
हेही वाचा - पुसदमध्ये भरदिवसा गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने तरुणाचा जागीच मृत्यू