यवतमाळ - ढाणकी - बिटरगाव रस्त्यासाठी बंदी भागातील नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल्याची घटना ताजीच असताना रविवारी रात्री बिटरगावपासून जवळ असलेल्या मन्याळी येथील गर्भवती महिलेचा खड्डेमय रस्त्यामुळे रुग्णालयात पोहचण्यास विलंब होवून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण यवतमाळ जिल्हा हादरला आहे.
हेही वाचा - Truck-Bus Accident : अमरावती-यवतमाळ मार्गावर एसटी-ट्रकची धडक; १८ प्रवासी जखमी, २ गंभीर
चिंचोली फाट्याजवळ प्रसुती कळा - नताशा अविनाश ठोके ( Natasha Thoke death ) (वय ३०) असे मृत महिलेचे नाव आहे. महिलेला प्रसुतीसाठी ढाणकी येथे आणत असताना खराब रस्त्यामुळे चिंचोली फाट्याजवळ अचानक प्रसुती कळा येऊन वेदना सुरू झाल्या. तसेच, वेळेत ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रात न पोहचता आल्याने उपचाराअभावी गरोदर मातेचा व पोटातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ढाणकी येथील दवाखान्यात महिलेला आणल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले.
मान्याळी गावात शोककळा - सदर महिलेच्या मृत्यूमुळे मन्याळी गावावर शोककळा पसरली असून, मन्याळी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मृतक महिलेच्या मागे एक मुलगा, पती, सासू, सासरे, आई वडील आसा आप्त परिवार आहे.
मनसेचा आंदोलनाचा इशारा - मन्याळी येथील महिला प्रसुतीकरीता येत असताना रस्त्यावरील खड्ड्याने तिचा बळी घेतला. त्यामुळे, सार्वजनिक बांधकाम अभियंत्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये, असा सवाल मनसेचे शेख सादिक यांनी केला आहे. आठ दिवसांत सदर रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेख सादिक यांनी दिला.