यवतमाळ - कोरोना लस देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज झाले असून, पहिल्या टप्प्यात 14 हजार 967 आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहे. शुक्रवारी जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना लस देण्यासंदर्भात यवतमाळ शहरातील पाटीपुरा भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रावर रंगीत तालीम पार पडली. यावेळी ही माहिती देण्यात आली.
एकाचवेळी तीन केंद्रावर रंगीत तालीम
कोरोना लस कशा पद्धतीने द्यायची, या केंद्रावर कुठल्या उपाययोजना करायच्या, आलेल्या व्यक्तीला कशा पद्धतीने हाताळावे, या लसीची जर रिॲक्शन आली तर काय करावे? याची संपूर्ण तयारी रंगीत तालीमदरम्यान करण्यात आली. पाटीपुरा येथील आरोग्य केंद्र, सावरगड प्राथमिक आरोग्य केंद्र आणि दारव्हा येथील उपजिल्हा रुग्णालयात रंगीत तालीम पार पडली. यामध्ये एकूण 75 कर्मचारी सहभागी झाले होते.
अशा पद्धतीने होणार लसीकरण
लसीकरणाची ही प्रक्रिया तीन स्टेजमध्ये राबवली जाणार आहे. लसीकरणाला येणाऱ्या व्यक्तीचे सर्वप्रथम व्हेरिफिकेशन करण्यात येईल. त्यानंतर त्याला व्हॅक्सिनेशन रूम मध्ये सोडले जाणार आहे. व्हॅक्सिनेशन झाल्यावर निगराणी कक्षात किमान 30 मिनिटे ठेवण्यात येणार आहे. या रंगीत तालमी दरम्यान त्याला कुठलीही रिॲक्शन आल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करण्याची व्यवस्था या केंद्रावर ठेवण्यात आली आहे.
चार टप्प्यात राबवले जाणार लसीकरण
कोरोना व्हायरस या लसीकरणाची ही प्रक्रिया जिल्ह्यात चार टप्प्यात राबवण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागातील डॉक्टर, आरोग्य सेवक, कर्मचारी अशा 14 हजार 967 जणांना ही लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये फ्रन्टलाइन वारियर म्हणून पोलीस विभाग, अग्निशमन दल, नगरपालिकेचे कर्मचारी व शासनाचे इतर विभागातील अधिकारी कर्मचारी यांना ही लस देण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षावरील नागरिक व ज्या नागरिकांना इतर दोन-तीन आजार आहेत अशा नागरिकांना आणि शेवटच्या चौथ्या टप्प्यामध्ये जिल्ह्यातील सर्व म्हणजे 27 लाख 70 हजार नागरिकांनाही कोरोना व्हायरसची ही लस देण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.