यवतमाळ- यावर्षी परतीच्या पावसाने कपाशीचे आणि सोयाबीनचे पीक उदध्वस्त झाले. त्यामुळे, आर्थिक कोंडीत सापडलेल्या महागाव तालुक्यातील उटी येथील शेतकऱ्याने शेतातच पायाला जिवंत विद्युत तार गुंडाळून आत्महत्या केली. ही घटना काल दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पंजाबराव माधवराव गावंडे (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
गावंडे हे अल्पभूधारक शेतकरी असून त्यांच्याकडे केवळ एक हेक्टर शेती आहे. शेतातील तुटपुंज्या उत्पन्नामुळे ते सातत्याने गरिबीशी दोन हात करीत होते. तसेच, त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज आणि खाजगी कर्ज होते. त्यात मागील तीन वर्षापासून त्यांच्या पत्नीला पॅरालिसिसचा आजार झाल्याने ते प्रचंड विवंचनेत होते. यंदा परतीच्या पावसाने शेतातील कपाशी नेस्तनाबूत केली होती. संकटांच्या मालिकेमुळे वैफल्यग्रस्त झालेले गावंडे यांनी जीवन संपवण्याचा निर्णय घेतला.
नेहमी प्रमाणे गावंडे हे सकाळी शेतात गेले. त्यांनी इलेक्ट्रिक तार पायाला गुंडाळली आणि मोटरपंपाच्या फ्यूजमध्ये तार टाकून स्वतःला करंट लावून आत्महत्या केली. गावंडे यांनी आत्महत्या केल्याची माहिती महागाव पोलिसांना देण्यात आली. गावंडे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे.
हेही वाचा- भारतीय संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही - पालकमंत्री संजय राठोड