यवतमाळ - कोरोनाचे संकट हे अतिशय गंभीर असून या परिस्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे. त्यामुळे जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटात शासन-प्रशासन तसेच गावपातळीवरील सर्व यंत्रणा अतिशय जोमाने लढत आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यामुळे सर्वांची एकजूट असणे आवश्यक असून वैद्यकीय अधिका-यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली. प्रशासन व आरोग्य विभागामध्ये समेट घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय अधिका-यांच्या ज्या काही मागण्या आहेत, त्यापैकी बहुतांश मागण्या शासनाने मान्य केल्या आहेत. केवळ जिल्हाधिका-यांच्या बदलीवरच वैद्यकीय अधिका-यांनी ठाम न राहता जनतेचे हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी उद्यापासून कामावर रुजू व्हावे, असे आवाहन शिष्टमंडळाला केल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. इतर जिल्ह्यांपेक्षा यवतमाळची कामगिरी चांगलीच आहे. याचे संपूर्ण श्रेय येथील सर्व यंत्रणांना जाते. वैद्यकीय अधिका-यांच्या बैठकी यापुढे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात घेण्यासाठी नियोजन कऱण्यात येणार आहे. जिल्ह्यातील परिस्थितीबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती देण्यात आली असून विभागीय आयुक्तांनी देखील डॉक्टरांचे म्हणणे ऐकूण घेतले आहे, असे ते म्हणाले.
संपूर्ण यंत्रणा युद्धजन्य परिस्थतीसारखी कोरोनाचा सामना करत असून त्यासाठी काही मतभेद झाले असल्यास ते नक्की सोडवण्यास येतील, असे आश्वासन राठोड यांनी दिले. मात्र नागरिकांचा विचार करून डॉक्टरांनी आपली सेवा बजावावी, असे आवाहन त्यांनी केले.