यवतमाळ - 26 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या कालावधीत ‘लोकशाही निवडणूक व सुशासन’ पंधरवडा साजरा करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन पालक मंत्री संजय राठोड यांनी केले आहे. या अंतर्गत मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शाळा-महाविद्यालयांनी या संदर्भात निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि चर्चासत्रांचे आयोजन करावे असे ते म्हणाले.
भारतीय प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय कार्यक्रम पोस्टल ग्राऊंड येथे पार पडला. यावेळी वने, भूकंप पुनर्वसन मंत्री संजय राठोड यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी वीरगती प्राप्त झालेल्या जवानांच्या पालकांचा तसेच पत्नींचा सन्मान करण्यात आला. यामध्ये पुसद तालुक्यातील रहिवासी वीर पिता यशवंत थोरात, यवतमाळमधील वीरपत्नी मंगला देवचंद सोनवणे तसेच नंदाबाई दादाराव पुराम, वाघापूर येथील सुनिता प्रकाश विहिरे यांचा समावेश होता.
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कालिंदा पवार, नगराध्यक्ष कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलीस अधीक्षक मेघनादन राजकुमार व अन्य अधिकारी उपस्थित होते.