यवतमाळ - जिल्ह्यातील आर्णी तालुक्यातील तरोडा (मांगुळ) येथील हुतात्मा पोलीस जवान अग्रमन बक्षुजी रहाटे यांच्यावर शुक्रवारी सकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसांनी रायफलच्या फैरी झाडून मानवंदना दिली. आपल्या या लाडक्या वीर सुपुत्राचे अंतिम दर्शन घेता यावे यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तरोडा व मांगुळ या गावातून वीरजवान अग्रमन रहाटे यांची अंत्ययात्रा काढण्यात आली.
लहान भाऊ आशिष रहाटे आणि ४ वर्षीय गार्गीने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी आई निर्मला, पत्नी रेश्मा, मुलगी गार्गी, आरुषी, बहीन सुकेशना डांगे, लीना खोब्रागडे यांनी अंत्यदर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री मदन येरावर, महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, तहसीलदार श्रीकांत निळ यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली. अंत्यसंस्कार करतेवेळी हजारो नागरिकांनी भारत माता की जय, अग्रमन रहाटे अमर रहे, वंदे मातरम अशा घोषणा देत आपल्या लाडक्या सुपुत्राचा साश्रू नयनांनी अखेरचा निरोप घेतला.