यवतमाळ - भारतीय सैन्यदलात प्रशिक्षणार्थी म्हणून भरती झालेल्या जवानाचा कर्नाटकमधील बेळगाव येथे हृदयविकाराने मृत्यू झाला. विक्रांत पंडित भाजीपाले (21, रा. किन्ही, ता. यवतमाळ), असे मृत प्रशिक्षणार्थी जवानाचे नाव आहे.
उपचारादरम्यान मृत्यू
सैनिक हा सैनिक असतो असे म्हणत विक्रांतच्या मित्रांनी गर्व व्यक्त केला. विक्रांतच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशिक्षणादरम्यान विक्रांतच्या छातीत दुखायला लागताच त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान विक्रांतचा मृत्यू झाला.
नागरिकांची गर्दी
विक्रांतचे वडिल पंडित भाजीपाले हे शेतकरी आहे. विक्रांतच्या मृत्यूची माहिती मिळताच मित्रांनी किन्ही गाठून आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली. विक्रांतचे पार्थिव मूळगावी येताच नागरिकांची एकच गर्दी उसळली होती. देशभक्तीपर गीतांमुळे वातावरण भावपूर्ण झाले होते. सैन्यात सेवा देण्यापूर्वी जगाचा निरोप घेणे, यामुळे अनेकांना आपले अश्रू लपविता आले नाहीत.