यवतमाळ - दिवाळीच्या तोंडावर भेसळ होण्याचे प्रकार लक्षात घेता अन्न व औषध प्रशासन विभागाकडून दुकानांची झाडाझडती सुरू आहे. भेसळीच्या संशयातून घाटंजी व यवतमाळ येथील दोन दुकानात छापेमारी करीत चार हजार 440 किलो खाद्यतेलाचा साठा 11 नोव्हेंबरला रात्रीच्या सुमारास जप्त करण्यात आला आहे.
अन्न व औषध प्रशासन विभागाची तपासणी मोहीम
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने यवतमाळ येथील अशोक कुमार ट्रेड्रस व घाटंजी येथील गणेश किराणा स्टोअर्स या दुकानावर छापा टाकला. भेसळीच्या संशयातून विविध आनंद सोयाबीन व इतर ब्रॅण्डचे 4440 किलो खाद्य तेल जप्त करण्यात आले. या तेलाची किंमत पाच लाख 767 रुपये आहे. सणासुदीनिमित्त विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. दिवाळीपर्यंत भेसळ तपासणी मोहीम सुरूच राहणार आहे.
भेसळ होत असल्यास प्रशासनाला कळवावे
दिवाळीच्या तोंडावर खाद्यतेल व मिठाई या दोन प्रकारात जास्त प्रमाणात भेसळ होत असते. त्याचप्रमाणे इतर खाद्यपदार्थ विक्रीमध्ये कुठे भेसळ होत असल्यास नागरिकांनी पुढे येऊन अन्न व औषधी प्रशासन विभागाला तातडीने कळवावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त कृष्णा जयपूरकर यांनी केले आहे.
हेही वाचा - गोंदिया पोलिसांना १० वर्षापासून चकमा... अखेर छत्तीसगडमध्ये जेरबंद केला जहाल नक्षली