यवतमाळ - जिल्हाधिकाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीच्या निषेधार्थ आज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांनी राजीनामा दिला. त्यांच्या या राजीनाम्यामुळे जिल्ह्यातील कोविड यंत्रणा कोलमडण्याची शक्यता नाकारता येत नाही आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याने 28 सप्टेंबरला जिल्हा परिषदेच्या 89 वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण यांच्यासह जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. सुभाष केंद्रे, उपसंचालक कुष्ठरोग डॉ. प्रशांत पवार, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. संघर्ष राठोड, डॉ. सुभाष ढोले यांनी सुद्धा आज मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडे राजीनामे दिले आहे.
ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषदेचे आरोग्य विभागाचे अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी हे दिवस-रात्र एक करत आहेत. आपल्या न्याय्य मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली असता, कुठलेही म्हणणे ऐकून न घेता अपमानास्पद वागणूक दिली. असा आरोप वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचा धमकीवजा इशारा वारंवार देण्यात येत असल्याचा आरोपही करण्यात आला. जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे 63 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 435 उपकेंद्रे कार्यरत आहेत. यामध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी असे एकूण एक हजार 800 वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी काम करीत आहे. त्यांना वेठीस धरण्यास येत आहे. त्यामुळे राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय अकोलकर यांनी जिल्हाधिकारीच्या बदलीची मागणी केली आहे.
यासंदर्भात प्रशासन व डॉक्टरांच्या संघटनेसोबत डॉक्टरांच्या विविध मागण्या व अडचणीसंदर्भात संघटनांचे प्रतिनिधी निवेदन घेऊन आले होते. गत सहा महिन्यांपासून जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन डॉक्टरांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहे. जिल्ह्याच्या पातळीवर त्यांच्या अडचणी सोडविण्याचा नेहमीच प्रशासनाचा प्रयत्न राहीला आहे. तर शासन स्तरावर डॉक्टरांच्या ज्या मागण्या आहेत. त्या सोडवण्याबाबतसुद्धा प्रशासन सकारात्मक असल्याचे जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितले.
असे आहे प्रकरण
मेग्मो संघटनेचे पदाधिकारी कमी मनुष्यबळ अभावी मागील अनेक महिन्यापासून ग्रामीण भागात अविरत वैद्यकीय सेवा देत आहे. मात्र, त्यांना कुठल्याही प्रकारची एकही दिवस सुट्टी मिळत नाही. सतत काम करत असल्याने त्यांची मन:स्थिती बिघडली आहे. त्यात जिल्ह्यातील 23 वैद्यकीय अधिकारी आणि 67 आरोग्य कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झाले आहेत.
अशावेळी वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी यांच्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 50 राखीव बेड ठेवण्यात यावे, तसेच कोरोनाच्या अहवालाबाबत माहिती सायंकाळी 7 पर्यंत घ्यावी, वैद्यकीय अधिकारी डॉ. बेग यांच्या पत्नीचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबाला शासनाने 50 लाख रुपयांची मदत द्यावी. आता सतत काम करीत असल्याने किमान रविवारची सुट्टी मिळावी, अशा स्वरूपाचे निवेदन घेऊन सर्व डॉक्टर यवतमाळ जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र, त्यांना जिल्हाधिकारी देवेंद्रर सिंग यांच्याकडून अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. या वागणुकीविरोधात डॉक्टर आणि अधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे देत काम बंद आंदोलन करीत आक्रमक पवित्रा घेतला आहे.
जिल्हा प्रशासनाच्या सोशल मीडियावरच्या ग्रुपमधून (व्हॉट्सअप ग्रुप) डॉक्टर आता बाहेर पडले आहेत. डॉक्टरांच्या या राजीनाम्यांमुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आणि प्रशासनाच्या वागणुकीमध्ये सुधारणा व्हावी अशी डॉक्टरांची मागणी आहे.