यवतमाळ - जिल्ह्यातील बोरी येथील सेवानिवृत्त सैनिकांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. वासुदेव कळंबे असे या निवृत्त सैनिकाचे नाव आहे. कोरोनासारख्या महामारीतून बचाव होण्यासाठी स्वखर्चाने मास्क शिवून ते ग्रामीण जनतेत वाटप करीत आहेत. त्यांनी भारतीय सेनादलात ५ वर्षे तर पोलीस दलात २० वर्षे सेवा प्रदान केली आहे.
आपला देश कोरोना महामारीच्या संकाटातून जात आहे. ग्रामीण भागात कोरोनाबद्दल जनतेच्या मनात धास्ती जरूर आहे. पण या विषाणुपासून आपली काळजी कशी घ्यायची याबद्दल जनजागृती आवश्यक आहे. अशातच वासुदेव कळंबे हे स्वखर्चाने शिलाई मशीनवर बसून कापडी मास्क शिवता आहेत. ग्रामीण भागातील जनतेला सपत्नीक घरोघरी जाऊन मास्कचे विनामूल्य वाटप करत आहेत आणि कोरोनाचा संसर्ग कसा टाळावा आणि कोणती काळजी घ्यावी याचे प्रबोधनसुद्धा करतात. कळंबे यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.