यवतमाळ - दक्षिण आर्णी वन परिक्षेत्रात येणाऱ्या पळशी (शिवरतांडा) शिवारात एका विहिरीत बिबट्या पडला. वनविभागाच्या पथकाने अथक प्रयत्न करून त्याला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.
कापूस वेचणीस गेलेल्या महिलांना दिसला बिबट्या -
पळशी शिवारात काशिनाथ राठोड यांची शेती आहे. त्यांच्या विहिरीत बिबट्या पडल्याचे शेतात कापूस वेचणीस गेलेल्या महिलांना दिसून आले. शेतकरी काशीराम राठोड यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी दक्षिण आर्णी यांच्याशी संपर्क करुन बिबट्याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तेथील परिस्थिती हाताळली.
यावेळी वनविभागाचे विशेष शिघ्र वन्यप्राणी बचावदल, अॅडवेंचर कोबरा अॅंण्ड नेचर क्लब आणि फिरते पथक पुसद ग्रुपच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला सुखरूप बाहेर काढले.
बिबट्याला इजा होऊ नये म्हणून विशेष काळजी -
बिबट्याला कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा इजा होऊ नये. याकरिता विशिष्ट प्रकारच्या शिडीची व्यवस्था करण्यात आली होती. अथक प्रयत्नानंतर बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले. यावेळी बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी झाली होती.
यवतमाळ वनविभागाचे उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक विपुल राठोड व दक्षिण आर्णी वनपरिक्षेत्र अधिकारी पवन जाधव यांच्या नियंत्रणात ही मोहीम पार पडली.
हेही वाचा- शरद पवारांचे आईला भावनिक पत्र; म्हणाले झुंज देण्याचे बाळकडू तुमच्याकडूनच