यवतमाळ - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ धमक्या देण्याचे काम करतात, असा हल्लाबोलथ विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. धमक्या आमच्याकडून नाही तर त्यांच्याकडून मिळतात. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची धमकी त्यांच्याकडून देण्यात येत असल्याचे प्रत्युत्तर वनमंत्री संजय राठोड यांनी दिले. घाटंजी येथे शिक्षक संघाच्या कार्यक्रमासाठी आले असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
महाविकास आघाडी सरकारला सत्तेत येऊन शनिवारी एक वर्ष पूर्ण झाले. त्यानिमित्ताने शिवसेनेचे मुखपत्र सामनासाठी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीत ठाकरे यांनी आडवे येणाऱ्या आडेव पाडून पुढे जाऊ असा इशारा, विरोधकांना दिला होता. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे हे धमकी देणारे महाराष्ट्रातील पहिलेच मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. त्याला वनमंत्री संजय राठोड यांनी प्रत्युत्तर दिले.
सरकार पाच वर्षे चालेल-
महाविकास आघाडी सरकार सहा महिने चालणार नाही, असे विरोधी पक्षनेते बोलत होते. आता एक वर्ष पूर्ण झाले. सरकार व्यवस्थित चालत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही पक्षात चांगला समन्वय आहे. लोकहिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय या सरकारने घेतले आहे. महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा वनमंत्री राठोड यांनी केला आहे.