यवतमाळ- झरी जामनी व मुकूटबन परिसरात वाघाची दहशत असून वाघाच्या पावलांचे ठसे शेतात आढळुन आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. आदिवासी बहुल झरी तालुक्यातील बहुतांश भाग घनदाट जंगलाने व्यापलेला आहे. जंगलात वाघ, हरीण, चितळ, चित्ता, लांडगे, कोल्हे, मोर, जंगली डुक्कर व इतर जंगली प्राणी मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यात निमनी, पवनार, शिबला, तेजापूर, खडकडोह परिसर हा घनदाट जंगल म्हणून ओळख आहे.
मागील दोन वर्षांपासून तालुक्यातील पवनार, निमनी, कोसारा, मार्की, शिबला व गणेशपूर परिसरात वाघाने मोठा कहर केला. वरील गावांसह इतर अनेक ठिकाणी पाळीव जनावरांवर हल्ले करून जनावरांची शिकार झाली आहे. महिला व पुरुषांनासुद्धा वाघाच्या शिकारीचे बळी पडावे लागले. ज्यामुळे शेतकऱ्यांसह गाकऱ्यांना वाघाच्या दहशतीत राहावे लागत आहे.
मुकूटबन गावाला लागून अर्धा किलोमीटर अंतरावर बंद असलेल्या कोळसा खाणीमागे असलेल्या शेतात वाघाचे ठसे आढळले. मुकूटबन येथील शेतकरी प्रकाश अडपावार, पुरुषोत्तम जिनावार, देवा येनगंटीवार, बक्का निल्लेवार व भुमन्ना मंदुलवार हे शेतात गेले असता त्यांना शेतात वाघाचे ठसे आढळले. इतरही शेतात वाघाचे ठसे आढळले. त्यामुळे या परिसरात वाघाचे वास्तव्य असल्याची शंका शेतकऱ्यांना आली.
त्या परिसरात जाण्यास शेतकरी भीत आहेत. बंद अवस्थेत असलेल्या कोळसा खडणीच्या मागच्या बाजूला अमेरिकन बाभळीची झाडे मोठ्या प्रमाणात घनदाट वाढली. या झाडा-झुडपात तर वाघ वास्तव्य करीत नाही ना अशी शंका शेतकरी घेत आहे. या घटनेची माहिती पांढरकावड वणी वनविभागाला देण्यात आली.