यवतमाळ - आत्तापर्यंत जिल्ह्यात कोरोनामुळे एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र, आज एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाल्यामुळे जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबधिताच्या मृत्यूची नोंद झाली. यवतमाळमध्ये कोरोना पॉजिटिव्ह रुग्णांचा आकडा 125 पर्यंत गेला असून यापैकी 99 जण बरे होऊन घरी गेले आहेत.
मृत्यू झालेल्या महिलेला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी मध्य रात्रीपासून शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, श्वसनाच्या त्रासामुळे तिचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना संदर्भात काही लक्षणे दिसताच त्यांनी जवळच्या कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर आणि शासकीय आरोग्य केंद्रात जावून तपासणी करून घ्यावी किंवा टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा. नागरिकांनी याबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नये. जिल्ह्यात कोरोनाच्या पहिल्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे आणि प्रशासनाच्या सर्व आदेशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी नागरिकांना केले आहे.
दरम्यान, मुंबईवरून आलेला आणि सुरुवातीपासून संस्थात्मक विलागिकरणात असलेल्या एका नागरिकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.