यवतमाळ - जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील श्रीराम नगर येथे शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत पाच घरे जळून खाक झाली आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
धम्मनगर येथील वस्तीमध्ये दुपारच्या सुमारास घरावरुन गेलेल्या ११ केव्ही विद्युत वाहिनीतून शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीचे लोळ पाट्यांच्या घरावर पडले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. या आगीत राहत्या घरातील अन्नधान्य, संसार उपयोगी साहित्य आणि महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली. यावेळी नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने समोर येऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आग आटोक्यात येत नाही हे पाहून पाणी पुरवठा करणाऱ्या नळाद्वारे पाणी सोडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, यासंदर्भात माहिती पुसद अग्निशामक विभागाला कळविण्यात आले. परंतु, अग्निशामक दलाची गाडी नादुरुस्त असल्याने उमरखेड आणि दिग्रस येथील अग्निशामक पाचारण करण्यात आले. त्यानंतर या गाड्या घटनास्थळी पोहोचून आग आटोक्यात आणली. आग आटोक्यात आली नसती तर लगत असलेल्या जवळपास १०० ते दीडशे घरांना आग लागली असती.