यवतमाळ - जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मालकी व ताबा असलेल्या जमिनीचा, राजकीय शक्तीच्या जोरावर अनाधिकृत ताबा घेऊन, त्या ठिकाणी असलेली झाडे अवैद्यरित्या तोडण्यात आली. तसेच या जमिनीवर अनाधिकृतपणे पिकांची लागवड देखील करण्यात आली. या प्रकरणी उमरखेड पंचायत समितीचे कृषी अधिकारी अतुल कदम यांनी, उमरखेड पोलिसात तक्रार दाखल केली असून त्यांच्या तक्रारीवरून जिल्हा भाजपा अध्यक्ष नितीन भुतडा यांचा सख्खा भाऊ विजय भुतडा व रामराव नरवाडे या दोघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण -
शेतसर्वे नंबर 43/1 मधील 1 हेक्टर 56 आर आणि शेतसर्वे नंबर 42 मधील सातबारावर यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा ताबा आहे. ही जमीन पूर्वी सखाराम गोविंद देव यांच्या नावे होती. ती जमिन जिल्हा परिषदेने खरेदी केली. या जमिनीवर असलेली झाडे विजय भुतडा आणि रामराव नरवाडे यांनी तोडली. तसेच त्यांनी या जमिनीवर अनाधिकृतपणे ऊस आणि हरभरा या पिकांची लागवड देखील केली.
प्रहार जनशक्तीकडून तक्रार
त्या जमिनीवर असलेली झाडे अवैधरित्या तोडण्यात आली. तेव्हा या प्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार करून संबंधितांविरूद्ध कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार तार कुंपन करण्याच्या हेतूने तिथे जिल्हा परिषदच्या वतीने मालकी व ताब्यासंदर्भात जाहीर सुचनेचे फलक लावण्यात आले होते. हे फलक काढून त्या जमिनीचा अनाधिकृत ताबा घेऊन भाजपा जिल्हाध्यक्षाचे भाऊ विजय भुतडा व बिटरगाव (खु) येथील रामराव नरवाडे यांनी ऊस व हरभरा पिकाची लागवड केली. यांच्याविरुद्ध पंचायत समितीचे कृषी अधिकारी अतुल कदम यांनी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - संशयास्पदरित्या जाणारा 36 लाखांचा दारूसाठा जप्त; यवतमाळ शहर पोलीस ठाण्याची कारवाई
हेही वाचा - 18 किलो गांजासह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघे एलसीबीच्या ताब्यात