यवतमाळ - अवकाळी पावसाने रडविल्यानंतर आता कापूस वेचणीला आला आहे. परंतु, मजूर मिळत नाही आणि मिळाले तरी ते वेचण्यासाठी लागणाऱ्या दराने बळीराजा दुहेरी संकटात अडकला आहे. कापूस वेचणीचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे, शेतात फुटलेल्या पांढऱ्या सोन्याचे नुकसान होताना बळीराजाला पाहावे लागत आहे.
शेती, शेतकरी आणि संकट हे नाते अधिकच घट्ट झाले आहे. अवकाळी पावसाने कापूस, सोयाबीनचे नुकसान झाले आहे. अशातही शेतात कापूस फुटून वेचणीला आला आहे. तर वेचणीसाठी गावात मजूर मिळत नसल्याने बाहेरून मजूर आणावे लागत आहेत. पर्यायी वाहनाचा अधिक भुर्दंड शेतकऱ्यांना सोसावा लागत आहे.
याशिवाय कापसाला हमीभाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तर, दुसरीकडे व्यापारी कवडीमोल भावात कापूस खरेदी करत आहे. सीसीआयने खरेदी सुरू केल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. त्यामुळे, सीसीआयने खरेदी करून दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. कापसाचे उत्पादन कमी आणि खर्च जास्त होत असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.