यवतमाळ - मारेगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा आणि नगरपंचायतमधील समस्या तात्काळ सोडाविण्यात याव्या, यासाठी वारंवार स्वराज्य शेतकरी संघटनेकडून निवेदने देण्यात आली. मात्र, याची कुठलीच दखल न घेतल्याने आज यवतमाळ-वनी महामार्गावरील मारेगाव येथील आंबेडकर चौकात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चक्काजाम व मुंडण आंदोलन करण्यात आले. यावेळी जवळपास दोन तास वाहतूक ठप्प झाली होती.
मारेगाव तालुक्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्याच्या सोयाबीन व कपाशीचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे मारेगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, तसेच मारेगाव शहरातील विविध समस्या नगरपंचायतीने तातडीने सोडवाव्यात. या मागण्याचे निवेदन स्वराज्य शेतकरी युवा संघटनेच्यावतीने संघटनेचे अध्यक्ष गजानन किन्हेकार यांनी तहसिलदार मार्फत पालकमंत्र्याना देण्यात आले होते. 13 ऑक्टोबरला निवेदन दिल्यानंतर 22 ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न झाल्यास रस्त्यावर उतरुन मुंडन आंदोलनाचा ईशारा दिला होता. या निवेदनाची राज्य सरकारने कुठलीच दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी आज रस्त्यावर उतरून चक्का जाम करून मुंडन आंदोलन केले. तहसीलदार व मुख्याधिकारी येईपर्यंत जवळपास दोन तास चक्काजाम करून टायर जाळण्यात आले. यावेळी प्रशासनाविरोधात तीव्र शब्दात घोषणाबाजी करण्यात आली. अखेर तहसीलदार दीपक पुंडे व मुख्याधिकारी यांनी दिलेल्या आश्वासनानुसार हे आंदोलन मागे घेण्यात आले.