यवतमाळ - शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे, या मागणीसाठी शेतकरी संघटनेने कायदेभंग आंदोलन केले. यावेळी निर्बंध घातलेल्या बीटी बियाणाची पेरणी करून निषेध नोंदवण्यात आला.
'मी सुद्धा एचटीबीटी शेतकरी', असा नारा यावेळी आंदोलकांनी दिला. हिवरी शिवारातील शेतात हे अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकरी संघटनेच्या शेतकऱ्यांनी देशभरात हजारो शेतकऱ्यांनी एचटीबिटी बियाण्याची लागवड करून निषेध नोंदवण्याचे आवाहन केले.
जागतिक बाजारपेठेत स्पर्धा करता यावी, कमी खर्चामध्ये शेतकऱ्याच्या हातात अधिक पीक मिळावे, यासाठी अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याचे स्वातंत्र्य शेतकऱ्यांना असावे, असे मत यावेळी मांडण्यात आले. अनेक वर्ष सरकारकडे पाठपुरावा करून देखील सरकार एचटीबीटी बियाण्यांवर बंदी उठवण्यास तयार नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेने सविनय कायदेभंग आंदोलनाचे हत्यार उपसल्याचे आंदोलकांनी सांगितले. यावेळी शेतात प्रतिबंधित बियाणाची पेरणी करण्यात आली.