यवतमाळ - बियाणे कंपन्यांनी बोगस बियाणे शेतकऱ्यांना विक्री केले. त्यामुळे पेरलं ते उगवलंच नाही, अशा तक्रारी अनेक शेतकऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत. त्याची चौकशी करुन गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिला.
कृषी मंत्री रविवारी (दि. 5 जुलै) यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी यावेळी पांढरकवडा तालुक्यातील खैरंगाव येथे शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. खरीप हंगामात शेतकऱ्यांनी पेरणी केलेले बियाणे उगविले नाही, अशा तक्रारी मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यात आली आहे. दोषी असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी आतापर्यंत 15 पेक्षा जास्त गुन्हे नोंदविण्यात आले असल्याची माहिती यावेळी मंत्री भुसे यांनी दिली. महाबीज कंपनीचे बियाणे ज्या शेतकऱ्यांचे उगवले नाही अशा शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात येत आहे, अशी माहिती कृषिमंत्री भुसे यांनी दिली.
हेही वाचा - मृत्यूनंतरचा प्रवासही खडतर; जिल्ह्यातील 464 गावांत स्मशानभूमीच नाही