यवतमाळ - मागील तीन-चार वर्षांपासून सोयाबीन, कापूस आणि तूर या तीनही पिकांना कधी नैसर्गिक तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागला. शेतातून लागवडीचा खर्चही निघत नव्हता. अशा परिस्थितीत येथील एका शेतकऱ्याने हळद या पिकाची लागवड केली. त्यांना या पिकाच्या माध्यमातून चांगले उत्पन्न आले आहे.
यवतमाळ तालुक्यातील वाई येथील शेतकरी शेख साबीर इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पिके घेत होते. एकदा महागाव तालुक्यातील हळद उत्पादक शेतकऱ्यांकडे त्यांनी भेट दिली. यातून हे पीक उत्तम प्रकारे घेत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आपणही या पिकाकडे वळावे, असा विचार करून त्यांनी 10 क्विंटल बेने म्हणून आपल्या एकरभरामध्ये हळदीची लागवड केली. पहिल्या वर्षी यातून त्यांनी हळदीतून 120 क्विंटल हळदीचे उत्पादन झाले. यातील 40 क्विंटल हळदीचे बेणे हे इतर शेतकऱ्यांना लागवडीसाठी दोन हजार रुपये क्विंटलप्रमाणे विक्री केली. यातून 80 हजाराचे उत्पन्न हाती आले. तर 60 क्विंटल हळद उकळून बाजारपेठेत विकली. यातून एक लाख दहा हजारांचे उत्पन्न हाती आले.
हेही वाचा - शेतकरी आणि बेरोजगारांच्या न्यायासाठी महाआघाडीला मतदान करा : राहुल गांधींचे आवाहन
त्यांनी 20 क्विंटल हळद ही आपल्या शेतामध्ये तीन एकरामध्ये लागवड केली आहे. यावर्षी अतिवृष्टी आणि इतर पिकावर रोग येत असताना हळद या पिकातून जवळपास 400 क्विंटल उत्पादन होण्याची अपेक्षा आहे. यातून शेख साबीर यांना खर्च वजा जाता जवळपास तीन लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. सोयाबीन, तूर, कापूस या पिकावर विविध रोगांचे संक्रमण होत असल्याने उत्पादनात मोठी घट येत आहे. तर रब्बी हंगामातील गहू, हरबरा पिकांना वन्यप्राण्यांचा मोठा धोका असतो. मात्र, हळद या पिकाला असा कुठलाच धोका नाही. उत्पादनही चांगले हाती येते. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनी कमी खर्चात जास्त उत्पादन देणाऱ्या हळद या पिकाकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
तर या हळदीसाठी हिंगोली, नांदेड येथील बाजारपेठ उपलब्ध आहे. याठिकाणी पाच ते सहा हजार रुपये प्रति क्विंटल भाव हळदीला मिळत आहे.