यवतमाळ - काही स्थानिक वृत्तपत्रांमध्ये 'माणिकराव ठाकरे यांना ग्रामीण भागात भरभरून प्रतिसाद' या मथळ्याखाली सकारात्मक बातम्या प्रसिद्ध झाल्या. एवढेच नाही, तर त्या बातम्यांमध्ये फारसा फरक नसल्याचेही दिसून आले. ही बाब लक्षात येताच निवडणूक आयोगाच्यावतीने जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी आज वाशीम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार माणिकराव ठाकरे यांना नोटीस बजावली आहे.
यात, वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या बातम्या पेड न्युज प्रकारात मोडतात. त्यामुळे त्यांचा समावेश कॉलम सेंटीमीटरप्रमाणे दर आकारून निवडणूक खर्चात का केला जाऊ नये, अशी विचारणा करण्यात आली आहे.
या नोटिशीचा खुलासा ४८ तासात न केल्यास आपणास काही म्हणायचे नाही, असे समजून पेड न्युज मार्गदर्शक तत्वानुसार कारवाई केली जाईल, अशी ताकीदही ठाकरे यांना देण्यात आली.