यवतमाळ- जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आता अन्य आजार असलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास खासगी रुग्णालय नकार देत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शहरातील प्रसिद्ध आयुर्वेदिक डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर खासगी रुग्णालयांमध्ये वेळीच उपचार मिळाले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
डॉ. शेख मुस्ताक शेख खलील यांचे पुष्पकुंज सोसायटीत निवासस्थान असून त्या ठिकाणीच शिफा हॉस्पिटल आहे. पहाटे 3 वाजताच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी कुटुंबियांना माहिती दिली. हॉस्पिटलमधील मदतनीस व कुटुंबियांना घेवून ते जवळच्याच नामांकित क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र, प्रवेशद्वारावर त्यांना रुग्णालयात सर्दी, ताप, खोकला ही कोरोना विषयक लक्षणे असलेले रुग्ण घेतले जात नाहीत. प्रथम कोरोनाची तपासणी करून या असे सांगितले. आपण डॉक्टर असल्याचे सांगितल्यानंतर देखील उपस्थित परिचारीकेने वरिष्ठांना विचारपूस केली जाईल असे सांगितले. यात वेळ जात असल्यामुळे ते डॉ. शहा यांच्या खासगी हॉस्पीटलमध्ये पोहोचले. या ठिकाणी देखील रुग्णावर तातडीने उपचार होण्याची स्थिती दिसून आली नाही. त्यामुळे डॉ. शेख हे जिल्हा रुग्णालयाकडे निघाले.
हेही वाचा-विम्याच्या प्रश्नासंदर्भात खासगी डॉक्टरांनी घेतली राज ठाकरेंची भेट
जिल्हा रुग्णालयाकडे जाताना डॉ.शेख यांची प्रकृती ढासळली. जिल्हा रुग्णालयात तपासणी करताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोरोनाच्या दहशतीमुळे खासगी रुग्णालयांमध्ये प्रचंड काळजी बाळगली जात आहे. कोरोना सदृश्य लक्षणे असलेल्या रुग्णांना तात्काळ दाखल करुन घेण्यात येत नाही, अशा पद्धतीच्या अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. यात आता डॉ. शेख या तज्ज्ञ आयुर्वेदीक वैद्याला देखील हृदयाघातानंतर उपचारासाठी रुग्णालयांमध्ये भटकंती करावी लागल्याची बाब पुढे आली आहे. या घटनेने यवतमाळकरांनी संताप व्यक्त केला असून सर्वसामान्य रुग्णांना खाजगी दवाखान्यांमध्ये उपचार मिळत नसल्याचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
डॉ. शेख हॉस्पिटलमध्ये आले आणि पाच मिनिटातच निघून गेले त्यांनी मोबाईल देखील उचलला नाही असा खुलासा क्रिटीकेअर हॉस्पिटलने दिला. एका डॉक्टरलाच उपचारासाठी खासगी रुग्णालयाच्या उंबरठ्यावरुन परत जावे लागल्याने त्याचा मृत्यू होणे, ही निश्चितच दुर्दैवी बाब असून सर्वच घटकांनी याप्रकरणी हळहळ व्यक्त केली आहे. सोबतच या पुढे तरी अशा घटना सामान्यांसोबतही घडू नये, या दृष्टीने प्रशासनाने पावले उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.