यवतमाळ - कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसंदर्भात तालुका प्रशासनाने केलेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सावरगड, रामपूर, पारवा आणि झरीजामणी तालुक्यातील शिबला येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व जांब येथील आश्रम शाळेला भेट देऊन पाहणी केली आहे.
लसीकरणाची पाहणी व यंत्रणेचा आढावा
जिल्हाधिकाऱ्यांनी सावरगड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची पाहणी केली. त्यानंतर घाटंजी तालुक्यातील रामपूर व पारवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन कोरोनाबाधित रुग्ण व लसीकरणाबाबत पाहणी केली. तसेच जांब येथील आश्रम शाळेला भेट देऊन कोविड केअर सेंटरबाबत नियोजन करण्याच्या सुचना दिल्या. तसेच पांढरकवडा येथे तालुकास्तरीय यंत्रणेचा आढावाही यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतला. आपापल्या कार्यक्षेत्रातील ग्रामस्तरीय समित्या सक्रीय करा. मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी बाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा त्वरीत शोध घेऊन त्यांची तपासणी करा, कोविड संदर्भात शासन आणि प्रशासनाने दिलेल्या निर्बंधाची कडक अंमलबजावणी करा, असे निर्देशही यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहे.