यवतमाळ - जिल्ह्यात कोरोनाचे तांडव सुरू आहे. आतापर्यंत 159 मृत्यू झाले असून मृतांचा आकडा दिवसेंदिवस फुगत चालला आहे. प्रत्येक दिवशी सरासरी पाच कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू होत आहेत. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी घेतली असून त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टरांची चांगलीच झाडाझडती घेतली.
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालयातील अनेक डॉक्टर खासगीरीत्या रुग्ण तपासत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह यांना वारंवार प्रशासनाने सूचना केल्या होत्या. मात्र, या सूचनांकडे अधिष्ठात्यांसह डॉक्टरांनी दुर्लक्ष करून आपले खासगी दवाखाने थाटात सुरू ठेवले आहेत. यावर कारवाई केली नाही तर, अधिष्ठात्यांवरच पहिली कारवाई करू, असा इशाराही जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिला आहे.
आतापर्यंत वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत डॉक्टरांनी कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी कोणकोणत्या उपाययोजना केल्या, किती वेळा कोविड वॉर्डात डॉक्टरांनी भेटी दिल्या, याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विचारणा केली. यावेळी समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. तसेच, वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांचे रोस्टर तीन महिन्यांपासून अपूर्णावस्थेत असल्याचे आढळले. एवढेच नाही तर, रुग्णालयात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचे मृत्यू का होत आहेत, हे विचारल्यावर डॉक्टरांकडे कोणतेही उत्तर नव्हते.
शासकीय रुग्णालयांच्या या स्थितीमुळे जिल्हाधिकाऱ्यांनी डॉक्टरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. खासगी रुग्णालय चालविणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना त्वरित कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश सिंह यांनी अधिष्ठाता डॉ. आर. पी. सिंह यांना दिले. तसेच, कर्तव्यात कसूर करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्यास मागेपुढे पाहू नका, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.