यवतमाळ - जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी 2 लाखांच्या लाचेची मागणी करून खासगी व्यक्तीमार्फत दीड लाख रुपये स्वीकारल्याप्रकरणी जात पडताळणी समिती उपआयुक्त एसीबीच्या जाळ्यात अडकल्या आहेत. अमरावतीच्या पथकाने सोमवारी जिल्हा जातपडताळणी कार्यालय, यवतमाळ येथे हीकारवाई केली.
हेही वाचा - शेती केली अन् मिळवला लाखोंचा नफा; सोनापूरच्या युवा शेतकऱ्याची यशोगाथा
उपआयुक्त जया विनोद राऊत, वरिष्ठ लिपिक नितीन कडे, खासगी व्यक्ती सावन प्रकाश चौधरी अशी सापळ्यात अडकलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार शिक्षकाने जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, यवतमाळ येथे जात वैधता प्रमाणपत्र मिळण्याकरिता प्रस्ताव सादर केला होता. उपआयुक्त जया राऊत आणि नितीन कडे यांनी जात वैधता प्रमाणपत्र देण्याकरिता दोन लाखाच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी पहिला हप्ता 1 लाख 50 हजार रुपये खासगी व्यक्ती सावन चौधरी याच्यामार्फत स्वीकारले. या प्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पथकाद्वारे सापळा लावून लाचखोरांना अटक करण्यात आली. तक्रारदाराने लाचेची रक्कम देताना 15 हजारांच्या खऱ्या नोटा आणि 1 लाख 35 हजार रुपयांच्या लहान मुलांच्या खेळण्यातील बनावट नोटा दिल्या.