यवतमाळ - जिल्ह्यात या वर्षीच्या खरीप हंगामकरिता आतापर्यंत 72 टक्के पीक कर्ज वाटप पूर्ण झाले आहे. यात जिल्ह्यातील 2 लाख 404 खातेदारांना 1578 कोटी 12 लाख रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. ज्या खातेदारांना कर्ज वाटप होऊ शकले नाही, त्यांना रब्बी हंगामाकरीता कर्जवाटप करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह त्यांनी दिले.
बँकेच्या प्रतिनिधींनी जिल्ह्यातील सर्व पात्र सभासदांच्या खात्यांचा आढावा घ्यावा, जिल्हा उद्योग केंद्र तसेच विविध महामंडळांच्या प्रमुखांनी बँकांकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत बँकेशी नियमित संपर्क साधून लाभार्थ्यांचे प्रस्ताव मार्गी लावावेत. प्रलंबित प्रस्तावांचा आढावा महिन्यातून किमान दोनवेळा घेणे गरजेचे आहे. तसेच प्रस्ताव त्वरीत मंजूर होण्यासाठी महामंडळांच्या प्रमुखांनी प्रयत्न करावे. आपल्या संथगतीमुळे लाभार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची जाणीव ठेवून काम करा. बँकांच्या काही अडचणी असेल तर त्यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून द्याव्या, अशा सूचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांपैकी 93 टक्के शेतकऱ्यांना खरीप हंगामात पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. तर मुद्रा योजनेंतर्गत यावर्षी शिशु, किशोर आणि तरूण गटातील एकूण 46 हजार 597 खातेदारांना एकूण 164.29 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, नागपूर येथील रिजर्व बँकेचे व्यवस्थापक उमेश भंसाली, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक दीपक पेंदाम, सेंट ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थचे विजयकुमार भगत, जिल्हा अग्रणी बँकेचे सचिन नारायणे उपस्थित होते.