यवतमाळ - घरी असलेल्या कोंबड्या-बकऱ्या इतकेच नव्हे तर पत्नीचे मंगळसूत्र विकून शेतकऱ्याने सोयाबीन बियाण्याची खरेदी केली. शेतात या बियाण्यांची पेरणी केल्यानंतर मात्र हे बियाणे बनावट निघाल्याने यवतमाळमधील शेतकऱ्यावर आता दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे.
यवतमाळ तालुक्यातील मंगरूळ येथील महेंद्र कृषी केंद्रातून बोगस बियाण्यांची विक्री केली जात आहे. अनेक कंपन्याचे सोयाबीन बियाणे बनावट निघाले आहे. त्यामुळे कृषी केंद्रावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रामेश्वर चव्हाण या शेतकऱ्याने कृषी विभागाकडे करताच संबधित कृषी केंद्राची तपासणी करून विक्री बंद करण्याचे आदेश काढण्यात आले.
मंगरूळ येथील महेंद्र कृषी केंद्रातून सोयाबीन बियाणे खरेदी केले. मात्र, पेरणी केल्यानंतर एकही अंकुर जमिनीवर न आल्याने शेतकरी रामेश्वर चव्हाण हतबल झाले आहे. त्यांनी संजय जिल्हेवार यांच्या महेंद्र कृषी केंद्रातून महाबिज आणि तिरुपती कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले होते. परंतु हे बियाणे बनावट असल्याने ते उगवलेच नाही. त्यामुळे शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा... कृषी विद्यार्थ्यांना अखेर दिलासा; राज्यातील कृषी व संलग्न अभ्यासक्रमांचे शैक्षणिक शुल्क भरण्यासाठी सवलत
शिवाय सोयाबीनच्या पिशवीवर मुद्रीत मुळ किमतीवर खोडतोड करुन मार्कर पेनने मनमानीपणे किंमत टाकुन परिसरातील शेतकऱ्यांना लुटत असल्याची तक्रार कृषी विभाग यांच्याकडे दाखल केली. तसेच बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालक याच्यासह बियाणे कंपनीवर कायदेशीर कारवाई करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या तक्रारीवरून कृषी विभागाने या कृषी केंद्राची तपासणी केली करून बियाणे विक्री बंदचे आदेश दिले. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट मानगुटीवर बसले आहे.