यवतमाळ - सोमवारी (२१ सप्टेंबर) पूस धरणात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला होता. व्यक्तीच्या पोटावर व छातीवर धारदार शस्त्राचे वार दिसून आले होते. या घटनेचा पुसद पोलिसांनी छडा लावला असून मृत व्यक्तीच्या पत्नीने तिच्या प्रियकारासह त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
मृतदेहावर तीक्ष्ण वार दिसून आल्याने हा खुनाचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता. तपासात मृत व्यक्ती हा पुसद तालुक्यातील घाटोडी येथील रहिवासी असून त्याचे नाव गोविंद प्रल्हाद बळी असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून गोविंदची पहिली पत्नी पूजा, तिचा प्रियकर चेतन कैलास डंगोरिया व त्याच्या इतर साथीदारांनी केला असल्याचे तपासात आढळून आले. आरोपींच्या साथीदारांमध्ये सचिन हराळ, राजेश पवार, शेख शाकीर शेख रऊफ व महेश उर्फ रामबहादूर रावल (सर्व रा. शिवाजीवार्ड) यांचा समावेश आहे. पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली आहे.