यवतमाळ - भावाने बहिणीच्या नावाचे बनावट बँक खाते उघडून धनादेशावर बहिणीची खोटी स्वाक्षरी करून 27 कोटी रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात भाऊ, बँक मॅनेजर आणि अकाउंटंट तसेच इतर सहा जणांविरोधात पोलिसांनी फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला.
पैसे मागितल्याने झाला वाद
श्रीरामपूर येथील रहिवासी नंदकिशोर जैस्वाल यांची बहीण जयश्री अजयकुमार मोर्या (रा. अमरावती) यांचे वसनगर परिसरामध्ये वाइन शॉप होते. त्यावर भाऊ नंदकिशोर जैस्वाल हा काम करीत होता. वाईनशॉपमालक जयश्री मोर्या या अमरावती येथे राहत असल्याने दुकानाचे सर्व व्यवहार माल घेणे-देणे विकणेचे कामकाज नंदकिशोर व त्याची पत्नी रश्मी जैस्वाल हे पाहत होते. दरम्यान जयश्री मोर्या यांच्या मुलीच्या लग्नासाठी नंदकिशोर यांच्याकडून पैसे मागितले असता त्यावरून वाद निर्माण झाला.
बनावट खाते केले तयार
नंदकिशोर जैस्वाल त्यांची पत्नी रश्मी व भाऊ रवी जैस्वाल यांच्यासह अकोला जनता को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर तथा अकाउंटंट यांनी संगणमत करून जयश्री मोर्या यांच्या बनावट सह्या करून चेकबुक आणणे, सह्या बदलविणे अशाप्रकारे फसवणुकीचे कार्य करीत या कार्यामध्ये बँक अधिकारी यांनी खातेदाराची शहानिशा न करता सही बदलविण्यात सहकार्य केले. यासोबतच आरोपींनी दुकानात बोलविलेल्या मालाची डीलरला नगदी पैसे न देता त्या रकमेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी केला, ती रक्कम हडप केली, त्या रकमेचा अपहार केला व डीलरच्या रकमेच्या बदल्यात जयश्री मोर्या यांच्या सहीचे चेक देऊन 27 कोटी 25 लाख 34 हजार 860 रुपयाची मागील चार वर्षांमध्ये अफरातफर केली. या प्रकरणाची तक्रार जयश्री अजयकुमार मोर्या यांनी वसंतनगर पोलीस स्टेशनला दिली. त्यावरून नंदकिशोर जैस्वालसह इतर नातेवाईक व बँक मॅनेजर अकाउंटंट यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.